Honey Production Business: अभियंता युवकाची मधनिर्मिती उद्योगात भरारी


Honey Production Business: अभियंता युवकाची मधनिर्मिती उद्योगात भरारी




Honey Production Industry: कान्होलीबारा (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथे येणूरकर कुटुंबीयांची साडेपाच एकर शेती आहे. कुटुंबातील नव्या पिढीचा ३१ वर्षे वयाचा शुभमने नागपूर येथून अभियंता पदवी प्राप्त केली आहे. एका प्रसिद्ध खासगी कंपनीत दीड वर्षे नोकरी केली. नोकरीत असताना शेतीतच काहीतरी करावे अशी ओढ लागली होती. त्यादृष्टीने पर्यायांच्या शोधात असताना पुणे येथील कृषी प्रदर्शनात मधमाशीपालन व मध उद्योगाविषयी सविस्तर माहिती मिळाली. अधिक अभ्यासातून त्यात चांगले भवितव्य असल्याच्या विचारापर्यंत शुभम येऊन पोहोचले. या उद्योगातून आपली स्वतंत्र ओळखदेखील तयार होईल असे त्यांना वाटले. त्यादृष्टीने सोशल मीडिया व अन्य स्रोतांमधून बारकावे जाणून घेतले.




प्रशिक्षण अभ्यासातून प्रगल्भता

शुभम यांनी व्यवसायात पाऊल टाकण्यापूर्वी पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन संस्थेतून (सीबीआरटीआय) काही दिवसांचे प्रशिक्षण घेतले. वर्धा जिल्ह्यातील श्री. सोनटक्के यांच्याकडून माहिती घेत २०१४-१५ मध्ये मधमाशीच्या एपीस मेलीफेरा जातीच्या तीन, तर इंडिका सिरानाच्या चार मधपेट्यांची खरेदी केल्या. एवढ्यावर न थांबता मूळ गुजराती मात्र मधमाशीपालनाच्या निमित्ताने राजस्थानात स्थलांतरित झालेले डॉ. धर्मेश वदर यांच्याशी संपर्क आला. त्यांच्याकडे त्या वेळी १२०० पेट्या होत्या. त्यांच्याकडे सहा महिन्यांचा व अन्य काही ठिकाणी तीन- चार महिने प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत या विषयातील ज्ञानात मोठी वृद्धी केली.

व्यवसायात भरारी


सन २०१८ मध्ये ४० मधपेट्यांच्या खरेदीतून खऱ्या अर्थाने व्यवसायाला सुरुवात झाली. घेतलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी आता कसोटी लागणार होती. मधमाशीच्या सर्व अवस्था, त्यांची वसाहत, आरोग्य, खाद्य, एकूण व्यवस्थापन व निगा या सर्व बाबी शुभम यांनी चोखपणे बजावण्यास सुरुवात केली. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मधमाश्‍यांच्या मृत्यूचा दर वाढतो. काही पक्ष्यांमुळेही धोका पोहोचतो. या संकटांपासून बचाव करण्यासाठीही योग्य दक्षता घेतली. अथक परिश्रम, सातत्य, अभ्यासपूर्ण नियोजनातून ५० मधपेट्यांपासून टप्प्याटप्प्याने आज चारशे पेट्यांपर्यंत मजल मारली आहे.



पेट्या स्थलांतराचे नियोजन

पिके व त्यांचा फुलोरा उपलब्धतेनुसार मधपेट्यांचे वर्षभर विविध राज्यांत होते स्थलांतर.

मध्य प्रदेशात फेब्रुवारी- मार्च या कालावधीत धने उत्पादन.

नोव्हेंबर ते जानेवारी- राजस्थानमधील कोटा भागात मोहरी.

सप्टेंबर, ऑक्‍टोबर- चित्रकूट (राजस्थान), शिवपुरी (मध्य प्रदेश) या भागात ओवा.

ऑगस्ट- व्यावर, पाली (राजस्थान)- बोरपीक

मार्च ते मे- पंजाब- मल्टिफ्लोरा (जंगलात बहरणारी फुलझाडे)

सरासरी साडेतीन किलोमीटर अंतरावरून मधमाश्‍यां करतात मध संकलन.

पेट्यांची ने- आण, त्या शेतात ठेवण्याचे नियोजन यासाठी तीन कर्मचारी.

पेट्यांच्या वाहतुकीसाठी एका कंटेनरमधून ३१० पेट्या वाहून नेल्या जातात.

मधाचा हाइव्ह हनी ब्रॅण्ड


वसाहतीतील मध वेगळा करण्यासाठी हनी एक्स्ट्रॅक्टर या यंत्राची सुविधा आहे. सुमारे ५० हजार रुपयांची गुंतवणूक त्यामध्ये केली आहे. शिवाय १२ ते १५ ट्रे, चाकू, नेट, आदी साहित्यही आहे. मधमाशीच्या एपिस मेलिफेरा या जातीपासून मध संकलित केला जातो. त्याचा हाइव्ह हनी ब्रॅण्ड लोकप्रिय केला आहे. यात ओवा, तुळस, रानतुळस, देशी बाभूळ, मोहरी, लिची, मल्टीफ्लोरा आदी प्रकार आहेत. सुमारे ३५० ते ४०० पेट्यांपासून १० ते १२ टनांपर्यंत मध मिळते. यात फुलांची उपलब्धता ही बाब महत्त्वाची ठरते. २० मिलि (दर ५० रुपये) ते एक किलो (७०० रुपये) पर्यंतच्या पॅकिंगमधून विक्री होते. याशिवाय देशातील दोन प्रसिद्ध कंपन्यांनाही ‘बीटूबी’ पद्धतीने बल्क स्वरूपात मध देण्यात येतो.



अन्य मूल्यवर्धित उत्पादने

शुभम यांनी मधाचे विशेष गिफ्ट बॉक्सही तयार केला आहे. हळदीकुंकू, वाढदिवस, विवाह, दिवाळी किंवा कोणत्याही शुभप्रसंगी देण्यासाठी तो योग्य असल्याचे ते सांगतात. बॉक्समध्ये ५० मिलि. वजनाच्या मधाच्या चार बॉटल्स असतात. केवळ मधापुरते मर्यादित न राहता मधमाशीपालनातून मिळणारे मेण या उपपदार्थापासून मेणबत्तीही तयार केली आहे. याशिवाय हनी कोंबच्या वड्या तयार केल्या असून, १२०० रुपये प्रति किलो दराने त्यांचा काही कंपन्यांना पुरवठा होतो. मागणी असल्यास परागांचीही विक्री होते.


विविध प्रदर्शनांमध्ये स्टॉलमधून मधासह या मूल्यवर्धित उत्पादनांचीही विक्री होते. स्टॉलमध्ये तयार केलेला ग्राहक संपर्क पुढेही कायम राहतो. त्यातून विक्रीवृद्धी होत राहते. अलीकडील काळात १२ ते १४ लाख रुपयांच्या वार्षिक उलाढालीपर्यंत व्यवसाय पोहोचला आहे. उत्पादनासाठी ‘फूड सेफ्टी’ परवाना घेतला आहे. प्रयोगशाळेत नमुन्यांचे परीक्षणही केले आहे. आपल्या व्यवसायात त्यांनी परराज्यांतील एक भागीदारही करून घेतला आहे. या व्यवसायामुळे आर्थिक प्रगती झालीच. पण कुटुंबाकडेही पुरेसा वेळ देता येतो, असे शुभम सांगतात.



मधपेट्या विक्रीतून उत्पन्नस्रोत

मध व अन्य उपपदार्थांच्या विक्री व्यतिरिक्त दरवर्षी वसाहती असलेल्या मधपेट्यांची ४५० ते ५०० च्या संख्येने विक्री होते. हंगामात प्रति पेटी ४२०० ते ४५०० रुपये, तर बिगरहंगामात ३५०० रुपयांपर्यंत दर असतो. त्यातून अतिरिक्‍त उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. लाकडी पेट्यांची खरेदी या क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांकडून घेतल्या जातात.


शुभम झाले मार्गदर्शक

एकेकाळी मधमाशीपालनातील विविध प्रशिक्षणे शुभम यांनी घेतली. मात्र आता ते अन्य शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक झाले आहेत. बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊनही प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणे घेतात. घरची साडेपाच एकर शेती असून, वडील नंदकिशोर पूर्णवेळ शेतकरी आहेत. कपाशी, तूर अशी पिके ते घेत होते. अलीकडे लिंबू, आंबा यांची लागवड शुभम यांनी केली आहे.

शुभम येणूरकर

७४९८५९०५२६

NextGen Digital... Welcome to WhatsApp chat
Howdy! How can we help you today?
Type here...