Beekeeping : मधमाशीपालनामुळे अर्थकारणाला मिळाली भरारी
Beekeeping : मधमाशीपालनामुळे अर्थकारणाला मिळाली भरारी
Success Story : वरोरा येथील रवींद्र जोगी यांच्या कुटुंबाची फक्त एक एकर शेती. तीही वडील पांडुरंग यांच्या नावे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रवींद्र जोगी यांनी ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केली. गेल्या २२ वर्षांपासून ते वरोरा - वणी या मार्गावर प्रवासी वाहतूक करतात. यातून उत्पन्न मिळत असले ,तरी फारशी शिल्लक राहत नाही. त्यामुळे ऑटो रिक्षासोबतच अन्य काही व्यवसाय करता येईल का, याची चाचपणी ते करत होते.
...असे वळले मधमाशीपालनाकडे
रवींद्र यांचे वडील पांडुरंग जोगी यांना तीन भाऊ होते. त्यांच्यामध्ये कुटुंबीयांची तीन एकर शेती वाटली गेली. लहानपणी वडिलांसोबत शेतात जात. त्या वेळी अन्य मुलांच्या सोबत ते शेतशिवारातील झाडावरील मधाची पोळी काढत. खरेतर मधाची गोडी तेव्हापासूनच लागली. गाडी चालवताना रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्याची त्यांची सवय उपयोगाला आली.
आकाशवाणीवरील एका मार्गदर्शनपर कार्यक्रमात आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्रा. (कै.) जेनेकर, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शाखेचे प्रमुख तात्यासाहेब धानोरकर यांचा मधमाशी पालनविषयक कार्यक्रम ऐकला. मग त्यांनी वरोरा येथील महारोगी सेवा समितीद्वारे चालविल्या जाणाऱ्या कृषी महाविद्यालयातील या दोन्ही तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यांची भेट घेऊन आपला मधमाशीपालनाचा मनोदय सांगितला. या दोन्ही तज्ज्ञांनी या व्यवसायातील तांत्रिक माहितीसह बारकावे समजावून दिले. भारतीय समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणही घेतले.
२००२ मध्येच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला तरी त्यासाठी आर्थिक गुंतवणूक शक्य होत नव्हती. त्या वेळी एका मधपेटीचा दर ३ हजारांच्या घरात होता. अन्य शेतकऱ्यांकडे मजुरीचे कामही केले. त्यातून आलेली रक्कम शिलकीत जोडून कशीबशी तीन हजार रुपयांची जुळणी केली. त्यातून पहिली पेटी खरेदी केली. सुरुवातीच्या काळात वारंवार पेटी उघडून त्यातील मधमाश्या आहेत की उडून गेल्या, याची चाचपणी करत असे.
त्यात राणी माशीला त्रास झाल्याने ती पेटीबाहेर पडली. तिच्यासोबत अन्य माशाही उडून गेल्या. त्यामुळे मधमाश्यांची वसाहत खरेदीकरिता पुन्हा पैसे खर्ची घालावे लागले. त्यानंतर प्रा. जेनेकर व इतरांकडूनही तांत्रिक मदत घेतली. एका पेटीतूनच माशांच्या दोन वसाहती तयार केल्या. पण नेमका उन्हाळा आला. वाढलेल्या तापमानात योग्य ती काळजी घेता न आल्यामुळे पुन्हा मधमाश्या उडून गेल्या. एका मागोमाग येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढून, अनुभवातून शिकत शिकत शहाणे झाल्याचे रवींद्र सांगतात.
पिरली गावाने दिला आधार
भद्रावती तालुक्यातील पिरली गावात पूर्वीपासून दहा ते बारा शेतकरी मधमाशीपालन करीत होते. या गावाला खादी ग्रामोद्योग आयोग अंतर्गंत मधुक्षेत्रीय अधिकारी विनायक मुलकनवार यांची भेट निश्चित झाल्याचे समजले. मग तिथे जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत अनुदानाविषयी माहिती मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पिरली गावात दहाया प्रशिक्षणात झाडाच्या ढोलीतून राणी माशी कशी पकडतात आणि पेटीमध्ये बंदिस्त कशाप्रकारे करावी लागते, याविषयी कळाले. त्याचा पुढे फार उपयोग झाल्याचे रवींद्र सांगतात. पिरली गावातील पोस्टमास्तर संजय कोलते, संजय मत्ते यांनी मधमाशीपालन व्यवसायाच्या उभारणीत विशेष सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
दरवर्षी असा होतो पुरवठा
कोल्हापूर येथील खादी ग्रामोद्योग मंडळाकडे आडजात लाकडांपासून तयार पेट्यांची मागणी नोंदवावी लागते. तिथे खादी ग्रामोद्योग मंडळाचाच मधपेटी निर्मितीचा कारखाना आहे. त्यांच्याकडून मागवून मधमाश्यांच्या वसाहती रवींद्र अन्य शेतकऱ्यांना विक्री करत. वर्षाला ५५ ते ६० मधपेट्या विकल्या जातात. शासनस्तरावरून ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबविली जातो.
त्यासाठी मधपेट्यांची खरेदी शासनस्तरावर होत असली तरी गेल्या काही काळापासून त्यातील मधमाश्यांचा वसाहतींचा पुरवठा रवींद्र करतात. या कामासाठी वर्षाला सरासरी ५०० मधमाशी वसाहतीचा पुरवठा होतो. या वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील अंधारवाडी (ता. पांढरकवडा) हे ‘मधाचे गाव’ म्हणून जाहीर झाले. त्यासाठी १२५ मधमाशी वसाहती पुरविल्या. गेल्या वर्षी नागपूर जिल्ह्याला ११०, तर भंडारा जिल्ह्यात ४० मधमाशी वसाहती पुरवल्या.
पेट्यांसह मधमाशी वसाहतींना खूप मागणी आहे. उलट मागणी इतक्या प्रमाणात मधमाश्यांच्या वसाहती तयार होत नाहीत. सातत्याने मिळणाऱ्या मागणीमुळे व्यवसायाची उलाढाल सात लाखांवर पोहोचल्याचे रवींद्र यांनी सांगितले. वर्षाला ५० ते ६० किलो मध स्वतः काढतात. सातेरी मधमाश्यांचा मध १००० रुपये प्रति किलो प्रमाणे विकला जातो. फुलांच्या हंगामात दर सात दिवसाला, तर फुलांचा हंगाम नसलेल्या काळात दर १५ दिवसाला मध मिळतो. एका बाजूने मध उत्पादन सुरू असले, तरी प्रामुख्याने मधपेटी आणि मधमाश्यांच्या वसाहती विक्रीवर रवींद्र यांचा भर आहे.
वसाहती वाढविण्याचे तंत्र
एका वर्षाला एका पेटीपासून पाच वसाहती मिळतात. कामकरी माश्यांची संख्या वाढली की नरांची संख्या वाढीस लागते. नर वाढले की राणी माश्यांची संख्याही वाढीस लागते. त्यामुळे राणी माश्यांच्या वेगळ्या वसाहती तयार केल्या जातात. या कारणामुळे वसाहतींच्या शोधात जंगलात भटकंती करावी लागत नाही. गेल्या २२ वर्षांपासून या व्यवसायात सातत्य ठेवले आहे. त्याची दखल घेत त्यांचा अनेक व्यासपीठावर गौरवही करण्यात आला आहे.

सातपुडी मधमाश्यांचे होते पालन
थंड प्रदेशात मेलीफेरा या युरोपियन जातीच्या मधमाश्यांचे पालन शक्य होते. त्यांची उत्पादकता प्रति वर्ष प्रति मधपेटी ७० किलो मध इतकी आहे. त्या तुलनेत सातपुडी (सातेरी) या भारतीय प्रजातीच्या मधमाश्यांची उत्पादकता केवळ २० ते २५ किलो इतकीच राहते. परंतु सातपुडी मधमाश्या या अतितापमानातही जिवंत राहू शकतात. त्यामुळेच गेल्या काही दशकांपासून त्यांचा वापर पेट्यांमध्ये होत असल्याचे प्रा. तात्यासाहेब धानोरकर यांनी सांगितले.
मुले होताहेत उच्चशिक्षित
अत्यल्पभूधारक असूनही आपल्या धडपडीतून रवींद्र यांनी परिस्थितीशी दोन हात केले. मधमाशी व्यवसायातून कुटूंबाची आर्थिक घडी सावरली आहे. सर्व सुरळीत सुरू असताना २०१८ मध्ये त्यांच्या पत्नी संगीता यांचे कर्करोगामुळे निधन झाले. त्यानंतर स्वतःला सावरून त्यांनी व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा मुलगा आदर हा छत्रपती संभाजीनगर येथे बी. टेक. करत आहे, तर मुलगी पारिजात ही बी.कॉम. करत आहे.
...अशी मिळाली पहिली ऑर्डर
नागपूर येथे एका संस्थेने भरवलेल्या कृषी प्रदर्शनात केंद्रीय मधुमक्षिकापालन संस्थेशी संलग्न श्री. गोळे यांचा स्टॉल होता. तिथे भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी माझ्याविषयी सांगितले. त्यामुळे नागपुरातील एका शेतकऱ्याकडून मला पाच पेट्या पुरवण्याची ऑर्डर मिळाली. सात हजार रुपये प्रति पेटी या प्रमाणे पहिलीच ऑर्डर पूर्ण केल्यामुळे आत्मविश्वास वाढला. तसाच शासकीय पुरवठ्यासाठी मागणी होऊ लागली. त्याला शासकीय पातळीवर मधमाशी वसाहतीचा दर ३०००, तर रिकाम्या पेटीची किंमत २४०० रुपये इतका दर मिळतो. पण त्यांची मागणी अधिक असल्याने परवडते. खासगी व्यक्तींना मधमाशी वसाहतीसह एक पेटी सहा ते साडेसहा हजार रुपयांत दिली जाते.
대화 참여하기